(अ. क्र. -३८३५)
(बाल श्रीकृष्णाने यशोदेसोबत केलेल्या बाललिलांचे वर्णन -)
(बाल श्रीकृष्णाने यशोदेसोबत केलेल्या बाललिलांचे वर्णन -)
भक्तीसाठी केली यशोदेसी आळी ।
थिंकोनिया चोळी डोळे देव ।।१।।
थिंकोनिया चोळी डोळे देव ।।१।।
देव गिळूनिया धरिले मोहन ।
माय म्हणे येथे कोण दुजे ।।२।।
माय म्हणे येथे कोण दुजे ।।२।।
दुजे येथे कोणी नाही कृष्णावीण ।
निरूते जाणोन पुसे देवा ।।३।।
निरूते जाणोन पुसे देवा ।।३।।
देवापाशी पुसे देव काय जाला ।
हासें आले बोला याचे हरी ।।४।।
हासें आले बोला याचे हरी ।।४।।
यांचे मी जवळी देव तो नेणती ।
लटिके मानिती साच खरे ।।५।।
लटिके मानिती साच खरे ।।५।।
लटिके ते साच साच ते लटिके ।
नेणती लोभिके आशाबद्ध ।।६।।
नेणती लोभिके आशाबद्ध ।।६।।
सांग म्हणे माय येरू वासे तोंड ।
तव ते ब्रम्हांड देखे माजि ।।७।।
तव ते ब्रम्हांड देखे माजि ।।७।।
माजि जया चंद्र सूर्य तारांगणे ।
तो भक्ताकारणे बाळलिला ।।८।।
तो भक्ताकारणे बाळलिला ।।८।।
लिळा कोण जाणे याचे महिमान ।
जगाचे जीवन देवाधिदेव ।।९।।
जगाचे जीवन देवाधिदेव ।।९।।
देव कवतुक दाखविले तया ।
लागतील पाया मायबाप ।।१०।।
लागतील पाया मायबाप ।।१०।।
मायबाप म्हणे हाचि देव खरा ।
आणिक पसारा लटिका तो ।।११।।
आणिक पसारा लटिका तो ।।११।।
तो हि त्यांचा देव दिला नारायणे ।
माझे हे करणे तो ही मी च ।।१२।।
माझे हे करणे तो ही मी च ।।१२।।
मीच म्हणवूनि जे ही जे जे ध्याती ।
तेथे मी श्रीपती भोगिता ते ।।१३।।
तेथे मी श्रीपती भोगिता ते ।।१३।।
ते मज वेगळे मी तया निराळा ।
नाही या सकळा ब्रह्मांडात ।।१४।।
नाही या सकळा ब्रह्मांडात ।।१४।।
तद्भावना तैसे भविष्य तयाचे ।
फळ देता साचे मी च एक ।।१५।।
फळ देता साचे मी च एक ।।१५।।
मीच एक खरा बोले नारायण ।
दाविले निर्वाण निजदासा ।।१६।।
दाविले निर्वाण निजदासा ।।१६।।
निजदासा खून दाविली निरुती ।
तुका म्हणे भूती नारायण ।।१७।।
तुका म्हणे भूती नारायण ।।१७।।
अर्थ -
एकदा श्रीकृष्णाने भक्तीसाठी यशोदेशी रडीचा डाव खेळला. तो मुद्दाम डोळे चोळण्याचे नाटक करू लागला. ।।१।।
त्याने देव्हाऱ्यातील देवाची मुर्ती तोंडात गिळली व गप्प बसून राहिला. यशोदेने बघितले की येथील देव्हाऱ्यातील देव कुठे हरवला तेव्हा तीने विचार केला की कृष्णाशिवाय हे कोण लपवणार ? कारण इथे कृष्णाशिवाय दुसरे आहेच कोण ? ।।२।।
इथे कृष्णाशिवाय दुसरे कुणीच नाही म्हणून ती श्रीकृष्णालाच विचारू लागली. ।।३।।
ती देवालाच (म्हणजे श्रीकृष्णालाच) विचारू लागली की, अरे इथला देव काय झाला ? मात्र तिच्या ह्या बोलण्याचे श्रीकृष्णाला फार हसू आले. ।।४।।
श्रीकृष्ण मनात म्हणाला, मी यांच्या जवळ असूनही हे मला ओळखत नाहीत. जे खरे आहे त्याला खोटे मानतात व जे खोटे आहे त्याला खरे मानतात. (म्हणजे देव नाही असे म्हणतात व जी माया नाही तिला सत्य मानतात.) ।।५।।
हे संसारी लोक लोभ आणि आशा यांच्या मायेमुळे जे सत्य आहे त्याला खोटे व जे खोटे आहे त्याला सत्य समजतात. ।।६।।
देव कुठे लपवला, असे यशोदेने दरडावून कृष्णाला विचारताच त्याने तोंड उघडून मोठे केले तेव्हा यशोदेने त्यात सगळे ब्रह्मांड पाहिले ज्यात चंद्र सूर्यासहीत सगळी तारांगणे होती. हे सर्व ज्याच्या मुखात होते तो भक्तांसाठी बाळरूप धारण करून लिला करत होता.।।७ - ८।।
ह्या देवाची लिला व त्याची महिमा कोणीच जाणू शकत नाही. ज्या देवता सगळ्या विश्वाचे जीवन असतात त्या देवतांचाही देव श्रीकृष्ण आहे. ।।९।।
देवाने त्यांना अशी लिला दाखवताच त्याचे आईवडील त्याचे चरण धरू लागले. ।।१०।।
कृष्णाचे आईवडील म्हणू लागले हा कृष्णच खरा देव असून बाकी सगळा खोटा पसारा आहे. ।।११।।
तितक्यात कृष्णाने तोंडातून त्यांचा गिळलेला देव (मुर्ती) काढून दिली व म्हणाला की, हाही मीच आहे व तोही मीच आहे. ।।१२।।
मला सर्वव्यापी समजून जे लोक जी जी गोष्ट उपभोगतात, ती सर्व मीच असतो. ती उपभोग्य वस्तू व उपभोगणाराही मीच श्रीपती असतो. ।।१३।।
अशा प्रकारे उपभोग्य वस्तू, उपभोग व तिला उपभोगणारा हे माझ्यावेगळे न राहता मीच असतो. माझ्याशिवाय वेगळे दुसरे काहीही ह्या ब्रह्मांडात नाही. ।।१४।।
ज्याची जशी भावना असते त्याच रुपात त्याला मी भेटत असतो. त्याच्या भक्तीला अनुरूप असे फळ देणाराही मीच असतो. ।।१५।।
मीच एक खरा असून बाकी सगळे मिथ्या आहे, असे नारायणाने त्याच्या अनन्य भक्तांना सांगितले. ।।१६।।
तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांच्या ठायी चराचरात भगवंतच असल्याची स्वरूपाची खूण श्रीकृष्णाने त्याच्या भक्तांना दाखवली. ।।१७।।
No comments:
Post a Comment