Followers

Monday, April 20, 2020

abhang


अनंत नामाचे पाठांतर । रामकृष्ण नाम निरंतर ।
सर्व सुखाचे भांडार। हरि श्रीधर नाम वाचे॥ १॥
हरिनाम गजर खरा । येणें तूं तरसील सैरा।
जन्म जुगाच्या येरझारा । खंडती एक्या हरिनामें॥२॥
अनंत तीर्थाचे मेळ। साधलिया हरिनाम कल्लोळ।
पूर्वजांसहित अजामेळ । उद्धरिला सहपरिवारें॥३॥
कोटि जन्मांचे दोष ।हरतील पातकें जातील निःशेष।
अंती होईल वैकुंठवास । कोटि कुळांसी उद्धार॥४॥
हें योगियांचे निजजीवन रामकृष्ण नारायण।
येणे जगत्रय होय पावन। हरिस्मरण जीवांसी॥ ५॥
ज्ञानदेवीं घर केलें। हरि ऐसें रत्न सांठविलें।
शेखीं कोटिकुळां उद्धरिलें । हरि हरि स्मरिलें निशीदिनीं ॥६॥
◆भावपराग◆
परमात्म्याचें अनंत नामे आहेत पण सुखाचे भांडारच असे जे राम, कृष्ण,श्रीधर वगैरे नाम तुझ्या मुखात असू दे. १. श्रद्धा पूर्वक या हरिनामाच्या गजरानें तूं तरून जाशील. या हरिनामाच्या योगाने तुझ्या जन्ममरणाच्या अनेक फेऱ्या खंडीत होतील. २. अनंत तीर्थांचे कल्लोळच असे जे हरिनाम ते तुला सहज तारून नेईल.हे पहा पापराशी अजामेळ भगवंताच्या नामाने आपल्या पूर्वजासहित सपरिवार उद्धरुन नेला नाही काय. ३. नामस्मरणाने कोट्यवधी जन्माची पातके, निःशेष होऊन शेवटी वैकुंठवास मिळतो. व कोटी कुळांचा उद्धारही होतो. ४.रामकृष्णादि नामाचे स्मरण हे योगी लोकांचे जीवन आहे. जगाला पावन करणारे, हरिचे नामस्मरण तूं
का करीत नाहीस. ५. मी स्वतःला घर करून त्यामध्ये हरिसारखे रत्न साठविले.आणि रात्रंदिवस हरिनामाचे स्मरण करून कोटी कुळांचा उद्धारही केला असे ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात.६.
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment