Followers

Tuesday, April 21, 2020

संत कोणाला म्हणावे

'संत कोणाला म्हणावे' - वारकरी संतत्वाची व्याख्या




भाग - १७.
ताटीचे अभंग - अभंग ५
( संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरत असलो व वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख असला तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. वारकरी परंपरेतील संत ही संकल्पना स्पष्ट करणारी लेखमाला. )
ताटीचे अभंग - अभंग ५
संत तोची जगी | क्षमा दया ज्याचे अंगी ||
लोभ अहंता नये मना | जगी विरक्त तोचि जाणा ||
इह परलोकी सुखी | शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ||
मिथ्या कल्पना मागे सारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
या अभंगात संतांचे दोन महत्त्वाचे गुणधर्म सांगून संतांचे लक्षण अथवा व्याख्या केली आहे. ज्याच्या अंगी क्षमा आणि दया वसतात तो संत अशी ही सुटसुटीत व्याख्या आहे. क्षमा म्हणजे इतरांनी आपल्या संदर्भात केलेला अपराध प्रतिकार न करता सहन करणे. दयेची संकल्पना व्यापक आहे. दयेचा संबंध आपण इतरांशी कसे वागावे याच्याशी आहे. “भूतांची दया हे भांडवल संता ” असे तुकोबांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. अंगी क्षमा आणि दया असणे हे संतांचे भावात्मक लक्षण आहे. लोभ आणि अहंता ज्याच्या अंगी नाहीत तो संत हे अभावात्मक लक्षण झाले. पण लोभ अहंता असणे याला भावरूप देऊन या गुणधर्माला विरक्ती हे नाव दिले. शुद्ध ज्ञान म्हणजे अगोदरच प्रतिपादले ज्ञान. ते ज्याच्याकडे आहे तो इहपरलोकी सुखी होतो. ज्ञानदेवांकडे ते आहेच. तेव्हा त्यांना चिंता कशाची? पाप-पुण्याची चिंता अज्ञान्यांना. अशा प्रकारच्या मिथ्या कल्पना दूर कराव्यात.

No comments:

Post a Comment