💐 संत एकनाथ महाराज अभंग💐
३७४
ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥
जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥
एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥
३७५
वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥
तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥
शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥
३७६
ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥
न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥
न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पांचग्र्नि साधन । नग्न मौन एकांत स्थान । आटाआटी न करणे ॥३॥
धरुनियां संतसंग । पाहें पाहे पांडुरंग देईन । सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४॥
No comments:
Post a Comment