Followers

Tuesday, April 21, 2020

abhang

पदपदार्थ संपन्नता।व्यर्थ टवाळी कां सांगतां।
हरिनामी नित्य अनुसरतां।हे सार सर्वार्थी॥१॥
हरिनाम सर्व पंथी।पाहावें न लगे ये अर्थी।
जे अनुसरले ते कृतार्थी।भवपंथा मुकलें॥२॥
कुळ तरलें तयांचें।जींही स्मरण केलें नामाचें।
भय नाहीं त्या यमाचें।सर्व ग्रंथी बोलियेलें॥३॥
नलगे धन नलगे मोल।न लगती कष्ट बहुसाल।
कीर्तन करितां काळ वेळ।नाहीं नाहीं सर्वथा॥४॥
हरि सर्व काळ अविकळ।स्मरे तो योगिया धन्य केवळ।
त्याचेनि दर्शन सर्वकाळ।सुफळ संसार होतसे॥५॥
ज्ञानदेवीं जप केला।मन मुरडुनी हरि ध्याईला।
तेणे सर्वांगी निवाला।हरिच जाला निजांगें॥६॥
◆भावपराग◆
वेदशास्त्राच्या पदपदार्थाचा अर्थ कळण्याची खटपट कशाला करता, एक हरिनाम सर्वार्थाचे सार समजून त्याचाच नित्य जप करा. १. वैदिक धर्माच्या सर्व पंथातून हरिच्या नामाचे महत्व गाईले असल्यामुळे शास्त्राचा विचार न करता ज्यानी एक हरिनामच स्मरण केले ते कृत्यकृत्य होऊन जन्ममरणरुप संसारातून कायमचे सुटले. २. ते एकटे सुटले असे नसून त्याच्या सर्व कुळाचाच उद्धार झाला. त्यांना यमाची भितीच राहिली नाही. असे सर्व धर्म ग्रंथात सांगितले आहे. ३. नामस्मरण करण्याला पैसे द्यावे लागत नाही. कष्ट पडत नाही, काळवेळाचे बंधन नाही. ४. हरि नेहमीच अव्यंग आहे म्हणून नामस्मरण करणारा योगी लोकानाही धन्य वाटतो. नामधारकाच्या दर्शनाने संसार सुफळ होतो. ५. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी अंतर्मुख होऊन हरिनामाचा जप केला व ध्यान केले, त्यामुळे सर्व दृष्टीने समाधान होऊन मी हरिरूपच झालो. ६.
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment