Followers

Wednesday, April 15, 2020

अ.क्र. - १६०

अ.क्र. - १६०
(हनुमान स्तवन -)
केली सीताशुद्धी ।
मूळ रामायणाआधी ।।१।।
ऐसा प्रतापी गहन ।
सकळ भक्तांचे भूषण ।।२।।
जाऊनी पाताळा ।
केली देवीची अवकळा ।।३।।
राम लक्षुमण ।
नेले आणिले चोरून ।।४।।
जोडोनिया कर ।
उभा सन्मुख समोर ।।५।।
तुका म्हणे जपे ।
वायुसूता जाती पापे ।।६।।
अर्थ -
ज्याने मुख्य रामायण घडण्याअगोदरच सीताशुद्धी केली. ।।१।।
असा जो अत्यंत प्रतापी असून सर्व भक्तांचे भूषण आहे. ।।२।।
त्याने पाताळलोकात जाऊन पाताळदेवीची अवकळा केली ।।३।।
तसेच अहिरावणाने जे राम लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले होते, त्या अहिरावणाचा वध करून राम लक्ष्मणाला सोडवून आणले. ।।४।।
जो श्रीरामासमोर नेहमी हात जोडून दास्यभावाने उभा असतो, ।।५।।
तुकोबा म्हणतात, त्या वायूपुत्र हनुमानाचे नामस्मरण करताच सगळी पापे नाहीशी होतात. ।।६।।
।राम कृष्ण हरी।

No comments:

Post a Comment