Followers

Monday, April 20, 2020

संत गोरोबाकाका

आज चैत्र वद्य त्रयोदशी
संत गोरोबाकाका पुण्यतिथी
वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवांना ज्याप्रमाणे माउली असे संबोधले जाते त्याचप्रमाणे गोरोबांना गोरोबा काका असे संबोधले जाते . ( संत परंपरेत सोपानदेवांचाही उल्लेख वारकरी मंडळी सोपानकाका असा करतात ) . नामदेवांच्या अभंगात मुक्ताबाईंच्या तोंडी गोरोबा काका असा उल्लेख आढळतो. ( म्हणे मुक्ताबाई भाजले कि कोरे | काकाचे उत्तर सत्य मानू ।। ) १९२८ साली प्रसिद्ध झालेल्या केतकरांच्या ज्ञानकोषात ‘हा भगवदभक्त सर्व संतमंडळांत पोक्त असल्यामुळें यास गोरोबा काका किंवा नुसतें काका म्हणत’ असा उल्लेख आहे .
गोरोबा काकांचा अधिकार विषद करताना मुक्ताबाईंच्या मुखी आलेले शब्द संत नामदेवराय लिहून ठेवतात –
गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे ।।
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वारी पाल्हाळला ।।
सोहं शब्दे विरक्ती उरली अंबरी । पती अणुभरी पाहिले पण ।।
म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण । जाऊ द्या शरण अव्यक्ताशी । ।
गोरोबाकाकांचे हात नव्हते त्याकाळात काकांची व कुटुंबाची उपासमार होऊ लागली. तेव्हा स्वतः पांडुरंग त्यांच्या मदतीसाठी रुक्मिणीसह आले. देवाने कुंभाराचा वेष घेतला. आईसाहेब कुंभारीण झाल्या. गरुड गाढव झाला व देव सहपरिवार गोरोबाकाकांच्या घरी येऊन मडकी घडवण्याचे काम करू लागले. याचेच वर्णन संत बंका यांनी पुढीलप्रमाणे केले आहे.
पहा हो नवल गोरियाचे घरी । कुल्लाळ भीतरीं स्वयें झाला ॥१॥
त्रैलोकी गमन ते झाले गाढव । आपुलें वैभव परतें ठेवी ॥२॥
गोणी भरोनियां स्वयें आणी हरी । त्याचें साहित्य करी रखुमाई ॥३॥
वंका म्हणे ऐसी आवडी भक्ताची । बोलतां वेदांची वाचा मौन्य ॥४॥

No comments:

Post a Comment